| तळा | वार्ताहर |
तळा नगरपंचायत हद्दीतील शेतकर्यांना विविध योजनांचा लाभ मिळावा तसेच मनरेगाची कामे व्हावीत यासाठी नगराध्यक्षा माधुरी घोलप यांच्यासह तळा तालुका शेतकरी संघटना व मुख्याधिकारी मनीषा वजाळे यांच्यामध्ये नगरपंचायत कार्यालय तळा येथे बैठक पार पडली.
तळा नगरपंचायत झाल्यापासून नगरपंचायत हद्दीतील शेतकर्यांना विविध योजनांची माहिती नसल्याने त्यांना त्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे या सर्व शेतकर्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा व मनरेगाची कामेही सुरू व्हावीत, अशी मागणी तळा तालुका शेतकरी संघटनेतर्फे मुख्याधिकार्यांकडे करण्यात आली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्याधिकारी मनीषा वजाळे यांनी लवकरच कृषी अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्यासह संयुक्त बैठक घेतली जाईल व त्यामध्ये याबाबत विचार केला जाईल, असे आश्वासन उपस्थित शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांना दिले. याप्रसंगी नगराध्यक्षा माधुरी घोलप, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत राऊत, उपाध्यक्ष रवींद्र मांडवकर, सचिव कैलास पायगुडे, नगरसेवक नरेश सुर्वे, शैलेश घोलप यांसह शेतकरी संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.