अॅड. भगीरथ शिंदे यांचे प्रशंसोद्गार
। उरण । वार्ताहर ।
रयत शिक्षण संस्थेत रायगड विभाग नेहमीच अव्वल राहिला असल्याचे प्रतिपादन रयतचे व्हाईस चेअरमन अॅड.भगीरथ शिंदे यांनी केले. रयतचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या, रायगड विभागामार्फत कृतज्ञता सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्या अंतर्गत वीर वाजेकर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय फुंडे(महालन, विभाग) तसेच तुकाराम हरी वाजेकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या मार्फत 21 किलोमीटर हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आलेले होते. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात शिंदे बोलत होते.
रायगड विभागात रामशेठ ठाकूर ,जे एम.म्हात्रे, पी. जे. पाटील आणि आ. बाळाराम पाटील यांच्यासारख्या नेतृत्वामुळे रायगड विभाग कोणत्याही बाबतीमध्ये मागे राहिलेला नाही तर उलट पहिल्या क्रमांकावर आलेला असल्याचे त्यांनी नमूद केले. आ.बाळाराम पाटील यांनी या कृतज्ञता सप्ताह मागे असलेल्या भावना बोलून दाखवल्या, पनवेल, गव्हाण, नावडा, कामोठे, जासई, पिरकोन आणि फुंडे येथील संकुलांमध्ये जे अनेक विविध कार्यक्रम तसेच स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या त्याचा तपशीलही सांगितला.
तत्पूर्वी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. प्रल्हाद पवार यांनी केले. सर्व मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आले. या हाफ मॅरेथॉन स्पर्धेमध्ये विविध गटातील सुमारे 2804 स्पर्धक सहभागी झाले होते, खुल्या गटातील 21 किलोमीटर आणि महिलांसाठी दहा किलोमीटर तसेच महाविद्यालयीन, 19 वर्षाखालील, 17 वर्षाखालील, आणि 14 वर्षाखालील मुले आणि मुली एकूण दहा गट या स्पर्धेत खेळवण्यात आले. प्रत्येक गटातून पहिल्या पाच स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली.
यावेळी रामशेठ ठाकूर, पी. जे. पाटील, जे .एम .म्हात्रे, प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, सुधीर घरत, भावना घाणेकर, कृष्णकांत कडू, आर. पी. ठाकूर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी झटणारे सुशील इनामदार, प्रवीण खुटारकर आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला, पारितोषकांचे वाचन डॉ. विलास महाले यांनी केले,डॉ.आमोद ठक्कर,तसेच राष्ट्रीय सेवा योजना,अधिकारी,राष्ट्रीय छात्र सेना व सर्व सेवकांनी सदर कार्यक्रमास सहकार्य केले. तर सूत्रसंचालन डॉ. सुजाता पाटील आणि डॉ. श्रेया पाटील यांनी केले.आभार प्रदर्शन डॉ.संदीप घोडके यांनी मानले.
कामोठेत 40 हजार फूट महारांगोळी
कामोठे येथील माजी आमदार दत्तूशेठ पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये रायगड विभाग कामोठे पनवेलच्या वतीने 40 हजार स्क्वेअर फुटी महारांगोळी तसेच खुल्या गटातील रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांचे उद्घाटन आ. दिलीप-वळसे पाटील यांच्या हस्ते झाले.