अमृतकुंभाने घेतले कचरा कुंड्यांचे स्वरूप
। चिरनेर । प्रतिनिधी ।
चिरनेर गावात ग्रामपंचायतीच्या मालकीच्या विहरींसह खासगी मालकीच्या देखील विहिरी आहेत. परंतु, अलीकडच्या काळात गावोगावी शासकीय नळपाणी योजनेचे पेव फुटले आहेत. त्यामुळे अवघ्या गावाची तहान भागविणार्या विहिरी सद्यस्थितीत दुर्लक्षित झाल्या आहेत. विहिरीतील गाळ काढून विहिरींची निगा राखण्याऐवजी विहिरींचा उपयोग कचराकुंडी सारखा केला जात असल्याने चित्र चिरनेर गावात दिसत आहे.
चिरनेर गावातील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी येथील विहिरीतील पाण्याचा वापर करत असत. उन्हाळ्यात या भागातील तळी, नाले, सार्वजनिक पानवठे, कोरडे होत असल्यामुळे घोटभर पाण्यासाठी महिलांना मैलोमैलची भटकंती करावी लागत होती. त्यामुळे चिरनेर-मुळपाडा येथे असलेली रहाट विहीर पाणीटंचाईच्या काळात जनतेसाठी अमृतकुंभ ठरली होती. मात्र, पाणीटंचाईच्या वणव्यात शासकीय नळपाणी योजना महत्त्वाच्या ठरल्या असल्या तरी येथील पूर्वापार ग्रामीण भागातील ग्रामस्थांची तहान भागवत असलेल्या विहिरींकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनीचे देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे विहिरींच्या काठावरील हंड्याची जागा उकिरडे, गवत, झाडे झुडपे व भंगार वस्तूंनी घेतली आहे. यात विशेषता: कातळपाड्यातील मुख्य रस्त्यात असलेल्या विहिरीचा काठ झाडे झुडपे आणि भंगार वस्तूंनी व्यापला असून, विहिरीचा उकिरडा झाला आहे. या रस्त्यातून ये-जा करणार्या नागरिकांकडून नाक धरून जावे लागत आहे. साधारणतः 20 ते 22 वर्षांपूर्वी या सर्व विहिरी सुस्थितीत होत्या.
अमृतकुंभांचे पावित्र्य राखण्याची मागणी
चिरनेर गावात जवळजवळ वीस-बावीस वर्षांपूर्वी नळपाणी योजना आली. तेव्हापासून एकेकाळी अमृतकुंभ ठरलेल्या या विहिरींकडे स्थानिक प्रशासनाबरोबर येथील नागरिकांचे दुर्लक्ष झाले आहे. येथील नागरिक विहिरींच्या पाण्याचा आता कोणत्याही कामासाठी वापर करत नाहीत. त्यामुळे आता ते पाणी वापर करण्यायोग्यही राहिलेले नाही. एकेकाळी मार्च, एप्रिल, मे या महिन्यांच्या अखेरीस येथील नागरिकांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागत होती. लग्नकार्यात तर रात्र-रात्र जागून टीपलीचे पाणी भरावे लागत असे. या गावातील जलदायनी ठरलेल्या रहाट विहिरीबरोबर गावातील इतर विहिरींनी देखील एकेकाळी येथील मानवी जीवांबरोबर गुराढोरांची तहान भागविली होती. त्या विहिरींना आता कचरा कुंड्यांचे स्वरूप आले आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने या गोष्टीची दखल घेऊन, विहिरींच्या काठावर साठविलेला भंगार काढून विहिरींची जागा स्वच्छ करावी आणि या अमृतकुंभांचे पावित्र्य राखावे, अशी मागणी स्थनिकांकडून होत आहे.