। उरण । वार्ताहर ।
कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने महिला सुरक्षिततेबाबत सद्यस्थितीत अस्तित्वात असलेले कायदे व महिला सुरक्षितता/गुन्हे नोंद या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक के.ए. शामा यांनी केले. तसेच, मुलींची सुरक्षितता, अध्यात्मिक जीवनशैली इत्यादी विषयांवर भाष्य करून विद्यार्थिनींनी आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे त्यानी सांगितले.
कार्यक्रमातील प्रमुख मार्गदर्शक पराग म्हात्रे यांनी घरगुती छळ व घराबाहेरील छळ याला कसे टाळले पाहिजे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. निकिता कासारे यांनी स्त्रीभ्रूण हत्या, हुंडा पद्धती, लैंगिक छळ, घरगुती अत्याचार, बेटी बचाव बेटी पढाव इत्यादी मुद्द्यांना स्पर्श करून विद्यार्थिनींनी सेल्फ डिफेन्सचे प्रशिक्षण घेतले पाहिजे, असे सांगितले. संघश्री गायकवाड यांनी भारतीय न्याय संहिता, ऑनलाइन फीसिंग, सायबर क्राईम, माहिती तंत्रज्ञानातून घडलेले गुन्हे इत्यादी विषयावर सविस्तर भाष्य केले. तसेच, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र यशवंत मिसाळ यांनी उपस्थित विद्यार्थिनींना महिला सुरक्षितता व गुन्हे नोंद या विषयावर मार्गदर्शन करताना 112, 1097, 1930 या टोल फ्री नंबरवर अडचणींच्या काळात संपर्क करण्याची सुचना दिली.